भाजप नगरसेवकांच्या बैठकीनंतर पुणे महापालिकेत स्वतंत्र बैठक
पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेऊन समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्यानंतर काही दिवसांतच महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील कथित मतभेदांची चर्चा सुरू झाली आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महाप
bjp


पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेऊन समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्यानंतर काही दिवसांतच महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील कथित मतभेदांची चर्चा सुरू झाली आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि विभागप्रमुखांची बैठक घेतली. विशेष म्हणजे, या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले उपस्थित नव्हते.

गणेश बिडकर यांनी गुरुवारी शहरातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसह प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह तिन्ही अतिरिक्त आयुक्त आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, महापालिकेच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजूषा नागपुरे तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना या बैठकीचे निमंत्रण नसल्याने महापालिकेतील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या बैठकीमागील नेमके कारण किंवा पदाधिकाऱ्यांमधील मतभेदाबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande