
पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत अंतिम मतदार यादी निश्चित करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १३ लाख ३२ हजार ४१८ मतदारांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २४ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान सुनावण्या घेण्यात येणार असून, २८ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया नियमितपणे राबविली जाणार आहे.
नोटीस बजावल्याच्या तारखेपासून मतदाराला सुनावणीसाठी किमान सात दिवसांचा अवधी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदारांनानोटिसाबजावणे, त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे मागविणे आणि गरजेनुसार प्रत्यक्ष सुनावणी घेऊन ही प्रक्रिया अवघ्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी सांगितले की, नोटीस बजावल्यानंतर सुनावणीपूर्वी किमान सात दिवसांचा अवधी देणे आवश्यक आहे. नाव आणि पत्त्यातील दुरुस्तीसाठी मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास संबंधित प्रकरणे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडूनच निकाली काढता येतील.
त्यामुळे प्रामुख्याने २००२ मधील मतदार यादीशी पडताळणी न झालेल्या मतदारांच्या सुनावण्या घ्याव्या लागणार आहेत.नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये त्रुटी असलेल्या मतदारांनी आवश्यक पुरावे सादर केल्यास स्वतंत्र सुनावणीची गरज भासणार नाही. संबंधित दुरुस्ती बीएलओ स्तरावरच केली जाणार आहे. सुनावणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी २१ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ७०० सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहणार असून, त्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.नाव आणि पत्त्यातील दुरुस्तीची पाच लाख ७७ हजार ८२१ प्रकरणे बीएलओ स्तरावर निकाली काढली जाणार आहेत. त्यानंतर २००२ मधील मतदार यादीशी पडताळणी न झालेल्या सात लाख ५४ हजार ५९७ मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. या मतदारांना आपली ओळख, रहिवास आणि मतदार म्हणून पात्रता सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्वतंत्र सूचना, मदत केंद्रांची माहिती आणि २००२ मधील मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु