
परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। शेळगाव महाविष्णु :ज्येष्ठा गौरीच्या आगमनासोबतच आभाळ बरसले आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला अखेर काहीसा दिलासा मिळाला. तब्बल ४९ दिवसांच्या खंडानंतर शेळगाव शिवारात दमदार पाऊस झाला. उन्हाने तापलेली शेतजमीन या पावसाने चांगली भिजून निघाली असून कापूस आणि तुरीला या पावसाचा आधार मिळाला आहे.
३० जुलैनंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाची नितांत गरज होती. मात्र पाऊस न झाल्याने शेतकरी रोज आभाळाकडे डोळे लावून बसला होता. दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा कमी होत गेला आणि सोयाबीनची पिके सुकत करपत गेली. अखेर पाऊस बरसला, पण तोपर्यंत सोयाबीनचा हंगाम हातातून गेला होता. या पावसाचा सोयाबीनला फारसा फायदा होणार नसला तरी कापूस आणि तुरीला मोठा आधार मिळाला आहे. जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने या पिकांना पुढील काळासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.
एका बाजूला कापूस आणि तुरीला मिळालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला करपून गेलेले सोयाबीन पाहून बळीराजाची चिंता कायम आहे. वेळेवर पाऊस झाला असता तर सोयाबीनचा हंगाम वाचला असता, अशी खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पाऊस आला, मात्र सोयाबीन गेल्यानंतर, अशीच काहीशी परिस्थिती शेळगाव शिवारात निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis