
क्यूएआय 1707 मानांकनही प्राप्त; दोन वर्षांत 4 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार
नागपूर, 24 सप्टेंबर (हिं.स.) : मानवीय कल्याण ट्रस्टच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या अरुजीवा आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी हॉस्पिटलने आयुर्वेद क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानांकन प्राप्त केले आहे. संस्थेच्या माहितीनुसार, आयुष गुणवत्ता मानांकन प्राप्त करणारे अरुजीवा हे भारतातील पहिले आयुर्वेद रुग्णालय ठरले आहे. आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने ही मान्यता जाहीर करण्यात आली.
नागपुरात आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात या मानांकनाचे प्रमाणपत्र मानवीय कल्याण ट्रस्टच्या संचालक पद्मजा पाटील, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कौस्तुभ धुमाळ आणि अरुजीवा आयुर्वेद व नॅचरोपॅथी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शालीन भारती यांनी स्वीकारले. यावेळी आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव हे आभासी माध्यमातून उपस्थित होते. आयुष सचिव पद्मश्री राजेश कोटेचा यांचीही उपस्थिती होती. अरुजीवाने क्यूएआय 1707 मानांकनही प्राप्त केले आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार, हे मानांकन मिळवणारेही अरुजीवा भारतातील पहिले आयुर्वेद रुग्णालय आहे. एकूण 28 खाटांच्या या रुग्णालयात गेल्या सुमारे 2 वर्षांत 4 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
मधुमेह, सांधेदुखी व पाठदुखी, पचनसंस्थेशी संबंधित विकार, पक्षाघातानंतरचे पुनर्वसन तसेच जीवनशैलीशी संबंधित विविध विकारांसाठी येथे वैयक्तिक उपचारसेवा उपलब्ध करून दिली जाते. आयुर्वेदासोबत योग, नॅचरोपॅथी आणि फिजिओथेरपी यांचा समन्वय साधून रुग्णांच्या गरजेनुसार उपचार कार्यक्रम आखले जातात. याशिवाय वेलनेस थेरपी आणि पोषणाधारित आरोग्यसेवाही दिली जाते.रुग्णालयाच्या माहितीनुसार, रशिया, आइसलँड आणि आफ्रिकेतील काही देशांमधूनही रुग्ण उपचारासाठी अरुजीवामध्ये येतात. येथील वेलनेस कार्यक्रम 30 दिवसांपर्यंतचे असतात.
अरुजीवा हे आयुष एक्सलच्या संस्थापक समितीचे सदस्य असून, डिमेन्शिया सोसायटी ऑफ इंडियाशीही संबंधित आहे. घाना दौऱ्यादरम्यान आयुष एक्सलच्या वतीने आयोजित वेलनेस एक्स्पोमध्ये अरुजीवाने सहभाग घेतला होता. त्यानंतर न्यार्कोटे कॉलेज ऑफ होलिस्टिक मेडिसिनसोबत सामंजस्य करार करण्यात आला. प्रशिक्षणाची देवाणघेवाण आणि उपचारांसाठी रुग्ण संदर्भ सेवा हा या सहकार्याचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.रुग्णांच्या आहार आणि पोषणालाही अरुजीवाच्या उपचारपद्धतीत महत्त्व दिले जाते.
रुग्णाच्या वैयक्तिक गरजेनुसार आहारपद्धती निश्चित करून ती उपचार प्रक्रियेचा भाग मानली जाते. गुणवत्ता मानके, वैयक्तिक उपचारसेवा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर भर देत अरुजीवा आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी आणि फिजिओथेरपीवर आधारित सर्वांगीण आरोग्यसेवा विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी