रत्नागिरी : राजापूर पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीत १५ हजाराच्या बोनसचा ठराव
रत्नागिरी, 25 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत १५ हजाराचा बोनस देण्याचा ठराव पालिकेच्या बैठकीत संमत करण्यात आला. नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. याचबरो
रत्नागिरी : राजापूर पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीत १५ हजाराच्या बोनसचा ठराव


रत्नागिरी, 25 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत १५ हजाराचा बोनस देण्याचा ठराव पालिकेच्या बैठकीत संमत करण्यात आला.

नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. याचबरोबर शहरासाठी आवश्यक असलेली ट्रॅक्टर, डंपर आदी वाहने खरेदी करण्याचा ठराव संमत झाला. याबाबतचा मुद्दा नगरसेवक जमीर खलिफे यांनी मांडला. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी शेल्टर हाऊस उभारण्यात यावे, अशी मागणी काही नगरसेवकांमधून करण्यात आली. तसा ठराव करण्यात आला. कोदवली धरण परिसरात काही लोक पोहण्यासाठी जातात. तेथे काहीही अपघात घडू शकतो. त्यामुळे नागरिकांसाठी या धरणाचा परिसर प्रतिबंधित करण्याचा ठराव झाला. याबाबतचा पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच करण्यात येणार आहे. धरण परिसरात यापुढे कुणी नागरिक गेले आणि त्या ठिकाणी कोणता अपघात झाला तर सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील अशी सूचना नगरसेवक जमीर खलिफे यांनी मांडली. यावर्षी पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे शहरातील शीळ जॅकवेल आणि आंबेवाडी जॅकवेलनजीक बंधारे बांधण्यात यावेत असा ठराव करण्यात आला.

या सभेवेळी नगरसेवक दिलीप चव्हाण यांनी तालीमाखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी केली. नगरसेवक राहुल तांबे यांनी कोदवली धरण परिसर प्रतिबंधित करावा अशी मागणी केली. शहरातील काही भागातील सोलार हायमास्ट बंद पडले आहेत, ते तातडीने चालू करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक दिलीप अमरे यांनी केली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande