


रायगड, 25 सप्टेंबर (हिं.स.)।क्रिस्ट विद्यापीठाच्या पुणे-लवासा कॅम्पसमध्ये ‘भारतीय ज्ञानप्रणाली : कायदा, राजकीय सिद्धांत आणि अर्थशास्त्राशी आंतरसंबंध’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. भारतीय बौद्धिक आणि सांस्कृतिक परंपरांची समकालीन उपयुक्तता तपासण्यासाठी देश-विदेशांतील विद्वान, संशोधक आणि तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले.
माजी राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतीय सण, परंपरा, वेशभूषा आणि खाद्यसंस्कृतीत सांस्कृतिक एकात्मता प्रतिबिंबित होते, असे त्यांनी सांगितले. ‘विविधतेतील ऐक्य’ऐवजी ‘विविधतेचे ऐक्य’ हा शब्दप्रयोग अधिक योग्य असल्याचे नमूद करत, भारतीय परंपरांकडे परस्परांशी जोडलेल्या ज्ञानव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थेचा भाग म्हणून पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे प्रा. डॉ. के. एस. हरी यांनी सार्वजनिक अर्थशास्त्रात माणसाला आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. ऑक्सफर्ड धर्म केंद्राचे समन्वयक आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील डीफिल संशोधक प्रा. नितीश राय परवानी यांनी भारतीय विचारपरंपरेचा कायदा, नीतिशास्त्र, सार्वजनिक धोरण आणि समाजाशी असलेला संबंध मांडला.
समकालीन प्रश्नांवर भारतीय ज्ञानप्रणालीचा संभाव्य प्रभाव हा या परिषदेचा प्रमुख निष्कर्ष ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)