
लंडन, 25 सप्टेंबर (हिं.स.)।लंडनजवळील थेम्स नदीत दिशाभूल होऊन अडकलेल्या दोन डझनहून अधिक देवमाशांना एका मोठ्या संयुक्त बचाव मोहिमेद्वारे सुरक्षितपणे खोल समुद्राच्या दिशेने नेण्यात आले. केंटमधील ग्रेव्हसेंडजवळ थेम्स नदीच्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात देवमाशांचा एक कळप दिशाहीन होऊन पोहताना आढळला होता. बचाव पथके, मरीन पायलट्स आणि स्थानिक प्रशासनाने आठवड्याच्या शेवटी सुमारे सहा तासांची समन्वयित मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण २५ देवमाशांना सुरक्षितपणे नदीतून बाहेर काढण्यात यश आले.
पोर्ट ऑफ लंडन अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक इशारा जारी केला होता. ग्रेव्हसेंडजवळ नदीत देवमाशांचा हा कळप आढळल्यानंतर हा इशारा देण्यात आला. देवमाशांना घाबरवू नये आणि नागरिकांची सुरक्षाही सुनिश्चित व्हावी, यासाठी लोकांनी या परिसरापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले होते.
या देवमाशांना त्याच्या एक दिवस आधी मरीन पायलट्सनी पाहिले होते. तज्ज्ञांच्या मते, पायलट व्हेल दिसायला अनेकदा डॉल्फिनसारखे वाटतात, त्यामुळे लोकांचा गोंधळ होऊ शकतो. पोर्ट ऑफ लंडन अथॉरिटीच्या हार्बर मास्टर लिन किंडलिन यांनी सांगितले की, देवमाशांचा कळप अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होता आणि ते वेगवेगळ्या दिशेने पोहत होते.
बचाव पथकांना अत्यंत संयमाने काम करावे लागले. त्यांना वारंवार थांबून देवमाशांच्या स्थितीचा आढावा घ्यावा लागला. परिस्थितीची नाजूकता लक्षात घेऊन बचाव पथकांना अनेक वेळा आपली रणनीती बदलावी लागली.या मोहिमेत ब्रिटिश डायव्हर्स मरीन लाइफ रेस्क्यू, मरीन पायलट्स तसेच ग्रेव्हशॅम आणि थरॉक येथील स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी संयुक्तपणे काम केले.१९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता मध्य लंडनपासून जवळपास ३२ किलोमीटर पूर्वेला असलेल्या ग्रेव्हसेंड येथे आठ बोटींच्या मदतीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, थेम्स नदी हे देवमाशांचे नैसर्गिक अधिवास नाही.
नदीतील पाणी देवमाशांसाठी अत्यंत उथळ आहे आणि येथे त्यांच्या पुरेशा अन्नाचीही कमतरता आहे. बचाव पथकाला मोहीम पूर्ण करण्यासाठी सहा तासांहून अधिक वेळ लागला. कारण कळपातील काही मादी देवमाशांसोबत त्यांची नवजात पिल्लेही होती आणि त्यांना वारंवार विश्रांतीची गरज भासत होती.
बचाव मोहीम यशस्वी झाली असली तरी या मोहिमेदरम्यान दुर्दैवाने दोन देवमाशांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक देवमासा आधीपासूनच आजारी असल्याचे दिसत होते आणि नंतर तो नदीच्या किनाऱ्यावर आला. दुसरा देवमासाही किनाऱ्यावर पोहोचला आणि त्यानंतर पुन्हा पाण्यात गेला. मात्र, बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, त्याच दिवशी नंतर त्याचाही मृत्यू झाला.
हार्बर मास्टर लिन किंडलिन यांनी या मोहिमेचे वर्णन त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत असामान्य आणि अविस्मरणीय मोहिमांपैकी एक असे केले. त्यांनी सांगितले की, दिशाभूल झालेल्या देवमाशांच्या संपूर्ण कळपाला सुरक्षितपणे बाहेर काढणे हा त्यांच्या सेवाकाळातील असा अनुभव होता, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode