
आल्बनी, 25 सप्टेंबर (हिं.स.)।दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना एका पत्रकाराने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्याविरोधात कारवाई कधी करणार, असा प्रश्न केला. मात्र, शहबाज शरीफ यांनी कोणतेही उत्तर न देता तेथून निघून जाणे पसंत केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्याची चर्चा सुरू आहे.
न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात प्रवेश करत असताना पत्रकाराने त्यांना विचारले, “पंतप्रधान महोदय, तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देणे कधी बंद करणार?” तसेच, शहबाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून बाहेर पडत असताना त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही लष्कर-ए-तैयबाचा (LeT) प्रमुख हाफिज सईद याच्यावर खटला कधी चालवणार?”मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. हा प्रश्न विशेष महत्त्वाचा मानला जात आहे, कारण शहबाज शरीफ दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मोठमोठे दावे करत असतात.
याच्या एक दिवस आधीच न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर शहबाज शरीफ यांना विमानतळावरही मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. न्यूयॉर्क विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कोणताही अमेरिकन नेता किंवा अधिकारी उपस्थित नव्हता. तसेच रस्त्यांवर ‘चोर आला’ आणि ‘चेरी पॉलिश’ असे मजकूर असलेले पोस्टरही लावण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode