
वॉशिंग्टन, 25 सप्टेंबर (हिं.स.)।चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चीन आणि अमेरिकेतील जनतेमधील ‘मैत्रीचे दूत’ म्हणून अमेरिकेला दोन पांडे भेट देण्याची घोषणा केली. जिनपिंग म्हणाले, “पिंग पिंग आणि फू शुआंग नावाचे दोन पांडे लवकरच अटलांटा प्राणीसंग्रहालयात पोहोचतील आणि अमेरिकन नागरिकांची भेट घेतील. हे जायंट पांडे चीन आणि अमेरिकेतील जनतेमधील मैत्रीचे दूत बनतील.”
एप्रिलमध्ये ‘चायना वाइल्डलाइफ कन्झर्वेशन असोसिएशन’ (सीडब्ल्यूसीए) आणि ‘अटलांटा झू’ यांच्यात झालेल्या नव्या संशोधन कराराअंतर्गत हे दोन पांडे अटलांटा प्राणीसंग्रहालयाला भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या करारानुसार, सीडब्ल्यूसीए ‘चेंगदू रिसर्च बेस ऑफ जायंट पांडा ब्रीडिंग’मधून नर पांडा ‘पिंग पिंग’ आणि मादी पांडा ‘फू शुआंग’ यांना अटलांटा येथे पाठवणार आहे. मात्र, पिंग पिंग आणि फू शुआंग अटलांटा येथे नेमके कधी पोहोचतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शी जिनपिंग यांनी सांगितले की, या दोन पांड्यांचा उद्देश “आपली मैत्री पुढे नेणे, सहकार्य वाढवणे आणि दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणाला चालना देणे” हा आहे. ते म्हणाले, “आपण प्रामाणिकपणे सहकार्य केले पाहिजे. अमेरिका आणि चीनचे हितसंबंध एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत आणि दोन्ही देशांसाठी एकत्र काम करण्यास मोठी संधी आहे.”
विशेष म्हणजे, १९७२ पासून जायंट पांडे हे अमेरिका आणि चीनमधील मैत्रीचे प्रतीक राहिले आहेत. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केला होता. या भेटीदरम्यान चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोउ एनलाई यांनी निक्सन यांना ‘लिंग-लिंग’ आणि ‘ह्सिंग-ह्सिंग’ नावाचे दोन पांडे भेट दिले होते.
त्यानंतर ‘लिंग-लिंग’ आणि ‘ह्सिंग-ह्सिंग’ यांना वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले. १९९०च्या दशकात मृत्यू होईपर्यंत ते या प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख आकर्षण राहिले. या भेटीतून पुढे ‘पांडा डिप्लोमसी’ अर्थात ‘पांडा कूटनीती’ म्हणून ओळखली जाणारी परंपरा सुरू झाली.जायंट पांड्यांशी संबंधित आणखी एक करार २०२४ मध्ये संपुष्टात आला. त्यावेळी अटलांटा प्राणीसंग्रहालयातील पांड्यांची एक जोडी चीनला परत पाठवण्यात आली होती.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीनमधील संबंध “पूर्वीपेक्षा अधिक चांगले” असल्याचे म्हटले. त्यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांचा आढावा घेतला.ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देश एकत्रितपणे असे संबंध निर्माण करू शकतात, ज्यामुळे आगामी पिढ्यांसाठी समृद्धी आणि सुरक्षिततेला चालना मिळेल.
आपले मत मांडताना शी जिनपिंग म्हणाले की, चीन-अमेरिका संबंध पुन्हा एका ऐतिहासिक वळणावर आले आहेत. ते म्हणाले, “आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि माझ्यात प्रामाणिकपणे आणि सखोल चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर आमच्यात सहमती झाली. त्यामुळे धोरणात्मक स्थैर्य असलेल्या चीन-अमेरिकेच्या रचनात्मक संबंधांना नवी मजबुती मिळाली असून, चीन-अमेरिका संबंधांना नवी धोरणात्मक दिशा मिळाली आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode