
रत्नागिरी, 25 सप्टेंबर, (हिं.स.) । ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या मंगलमय गजरात रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार १७५ घरगुती आणि ८ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींना आज भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे.
अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाच्या सांगता होत आहे. या दिवशी पोलीस आणि काही मोजक्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन आज होत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने समुद्र, नद्या, विहिरी आणि पाणवठ्यांवर पारंपरिक पद्धतीने विसर्जन होत आहे. शहरात तसेच काही ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्येही मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. निर्माल्याचे संकलनही करण्यात येत आहे.
ठिकठिकाणी विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू राहणार आहेत. त्या शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराची नोंद झालेली नाही. पावसानेही उसंत घेतल्याने विसर्जनामध्ये कोणताही व्यत्यय आला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी