
लातूर, 25 सप्टेंबर (हिं.स.)।
मुलीचे लग्न जुळत नसल्याने तिच्या पत्रिकेत ‘कुंडली दोष’ असल्याचे सांगून पूजा करण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात समोर आली आहे. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिसांनी भोंदू रामेश्वर हणमंतराव रामदासी (वय ४०) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायदा आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंडली दोष असल्याचे सांगून कुटुंबाला घेतले जाळ्यात
पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न जुळत नसल्याने तिचे आई-वडील चिंतेत होते. परिचयातील काही व्यक्तींनी रामेश्वर रामदासी हा पूजा-अर्चा करून कुंडली पाहतो आणि दोष दूर करतो, असे सांगितले. त्यानंतर पीडितेचे आई-वडील त्याच्याकडे गेले. रामदासीने मुलीची पत्रिका पाहून तिच्या कुंडलीत दोष असल्याचे सांगितले आणि तो दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले.
घरातील खोलीत पूजा मांडून अत्याचार
जून २०२६ मध्ये रामदासी पीडितेच्या घरी गेला. त्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पूजा मांडली आणि पीडितेच्या आई-वडिलांना दुसऱ्या खोलीत बसवले. त्यानंतर खोलीचा दरवाजा बंद करून कुंडली दोष दूर करण्यासाठी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे सांगत त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास कुंडली दोष दूर होणार नाही, अशी भीतीही त्याने पीडितेला घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर
घटनेनंतर सुमारे तीन महिन्यांनी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलिसांनी रामेश्वर रामदासीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ६८१/२०२६, भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२)(एम), पोक्सो कायद्यातील कलम ४, ६, ८ व १२ तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील कलम ३(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी विवाहित; केवळ दहावीपर्यंत शिक्षण
रामेश्वर रामदासी हा विवाहित असून त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. पूजा-अर्चा करून कुंडली पाहणे आणि कुंडलीतील दोष दूर करण्याचा दावा तो करत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पीडितेचे आई-वडील कष्टकरी असून पीडिता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
या प्रकरणात आरोपीने कुंडली दोषाच्या नावाखाली कुटुंबाकडून पैसे घेतल्याचाही आरोप आहे.
आरोपी व गर्भाची डीएनए चाचणी होणार
पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याने या प्रकरणातील पुराव्यांच्या दृष्टीने आरोपी आणि गर्भाची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis