
कोल्हापूर, 25 सप्टेंबर (हिं.स.)। यंदा शेतकऱ्याच्या अपेक्षाप्रमाणे पावसाळा झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धती सोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच पर्यायाने एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेती केल्यास ती अधिक फायदेशीर ठरेल असे मत कृषी अभ्यासक दिलीप दळवी यांनी व्यक्त केले .
जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मौजे गडमुडशिंगी येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर माहिती अधिकारी फारुख बागवान, शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश बिसुरे,दिग्विजय पाटील,आदित्य गवळी, काशिनाथ बिरुणगी,प्रवीण जाधव रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
श्री दळवी म्हणाले , महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यान्वित आहे. अल्प पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करण्याला प्राधान्य द्यावे. तसेच कमी पाण्याची पिके घ्यावीत. त्याचबरोबर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युवकांनी - शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी असे आवाहन केले. तत्पूर्वी माहिती अधिकारी फारूक बागवान यांनी लोकसंवाद -2026 या उपक्रमा पाठीमागील भूमिका उपस्थितांना समजावून सांगितली. अशा लोकोपयोगी उपक्रमाचे प्रशासनाकडून वेळोवेळी आयोजन करण्यात यावे अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.याप्रसंगी रोहन पाटील , प्रकाश चव्हाण , सुमित सावंत , दिनकर कुरणे , महेश डोंगरे , प्रवीण जाधव ,समर्थ बिसुरे , जय पवार , प्रथमेश निचळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar