राज्यात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांचा जनसागर उसळला
मुंबई, 25 सप्टेंबर (हिं.स.)। अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांचा जनसागर उसळला आहे. मुंबईची शान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागच्या राजा’ आणि ‘मुंबईचा राजा’ यांच्या
Anant Chaturdashi 2026 Bappa Visarjan Celebration


Anant Chaturdashi 2026 Bappa Visarjan Celebration


Anant Chaturdashi 2026 Bappa Visarjan Celebration


Anant Chaturdashi 2026 Bappa Visarjan Celebration


मुंबई, 25 सप्टेंबर (हिं.स.)। अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांचा जनसागर उसळला आहे. मुंबईची शान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागच्या राजा’ आणि ‘मुंबईचा राजा’ यांच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने मध्य मुंबई भक्तिमय झाली आहे. यामध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी, करी रोडचा कैवारी, परळचा राजा, काळाचौकीचा महागणपती आणि तेजुकायाचा राजा यांचा समावेश आहे. लालबाग, परळ, भारतमाता आणि चिंचपोकळी परिसरातील रस्ते बाप्पाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी फुलून गेले आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण सुरू आहे.

गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत आहे. पहाटेपासूनच बाप्पाच्या अंतिम दर्शनासाठी भाविकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. चिंचपोकळी पुलावरून पुढे जात ही मिरवणूक भायखळा, नागपाडा, गिरगाव आणि ऑपेरा हाऊस मार्गे गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झाली आहे. बाप्पाचे विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे.

दुसरीकडे, नवसाला पावणारा ‘लालबागचा राजा’ याची विसर्जन मिरवणूकही मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. उत्तरपूजेनंतर लालबागच्या राजाला ऐतिहासिक मंडपातून बाहेर काढण्यात आले. लालबागचा राजा जेव्हा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है.... डमडमडम डमरु वाला..अशी गाणी वाजवण्यात आली. नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडंसं थांब ना...असं प्रत्येक गणेशभक्त म्हणत होता. राजाचे दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरात मोठी गर्दी झाली आहे. भव्य लाकडी तराफ्यावर विराजमान झालेला लालबागचा राजा पारंपरिक मार्गाने चिंचपोकळी, भायखळा, नागपाडा, सुतार गल्ली आणि ऑपेरा हाऊस मार्गे गिरगाव चौपाटीकडे रवाना झाला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे चौपाटीवर विसर्जन होणार आहे.

दहा दिवस भक्तिभावाने पूजा केलेल्या गणरायाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात पुढील वर्षी लवकर येण्याची आस दिसत आहे. राज्यभर सुमारे ५० हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि ५० लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. बाप्पाच्या अंतिम दर्शनासाठी सुमारे पाच कोटी भाविक रस्त्यावर उतरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दुसरीकडे, पुण्यातही भक्तिमय वातावरण आहे. पुण्यातील लाडका दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी निघाला असून, भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि आकर्षक देखाव्यांच्या साथीने बाप्पाची मिरवणूक काढली जात आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भाविकाचे अंतःकरण जड झाले आहे. जड अंतःकरणाने, डोळे पाणावलेल्या अवस्थेत भाविक बाप्पाला निरोप देत आहेत. संपूर्ण मुंबई आणि पुणे नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

मुंबईत विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी २4 हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही आणि सागरी सुरक्षा यंत्रणेद्वारे मिरवणुकीवर लक्ष ठेवले जात आहे. मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहरात ३८३ कृत्रिम तलाव उभारले आहेत. दीड, पाच, सहा आणि सात दिवसांच्या गणेशोत्सवात आतापर्यंत १ लाख ६३ हजार ३८६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गांवर १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, बॉम्बशोधक पथके, रुग्णवाहिका आणि जीवरक्षक पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे भक्ती, उत्साह आणि शिस्तीच्या वातावरणात मुंबईसह महाराष्ट्र गणरायाला भावपूर्ण निरोप देत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande