
तब्बल 24,131 फुटांवर रोवला भारताचा राष्ट्रध्वज
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर (हिं.स.) : भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) 23 जवानांनी उत्तराखंडमधील भारत-तिबेट सीमेवर असलेले 7,355 मीटर (24,131 फूट) उंचीचे आव्हानात्मक माउंट एबी गामिन शिखर यशस्वीपणे सर करत नवा विक्रम प्रस्थापित केला. गाल्या 16 सप्टेंबर रोजी अत्यंत कडाक्याची थंडी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जवानांनी या दुर्गम शिखरावर तिरंगा फडकावला.
ही ऐतिहासिक मोहीम फोर्स लेव्हल माउंटेनियरिंग एक्स्पेडिशन 2026चा भाग होती. या मोहिमेचे नेतृत्व डेप्युटी कमांडंट परीक्षित शाह यांनी केले. आयटीबीपीचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी 7 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील आयटीबीपी मुख्यालयातून या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. तब्बल 7 हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवरील या शिखरावर यशस्वी चढाई करणे अत्यंत कठीण आणि साहसी आव्हान होते. मोहिमेदरम्यान जवानांना अत्यंत विरळ हवा, ऑक्सिजनची मोठी कमतरता, गोठवणारी थंडी, विशाल हिमनद्या तसेच अचानक बदलणाऱ्या धोकादायक हवामानाचा सामना करावा लागला.या यशामागे अनेक आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण, अचूक नियोजन आणि प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी केलेला सराव महत्त्वाचा ठरला.
गढवाल हिमालयातील आव्हानात्मक शिखर
माउंट एबी गामिन हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील गढवाल हिमालयात स्थित आहे. हे शिखर माउंट कामेटपासून सुमारे 2 किलोमीटर ईशान्य दिशेला असून मीड्स कोलमार्गे कामेट मॅसिफशी जोडलेले आहे. या पर्वताच्या उत्तरेकडील उतारांचा विस्तार तिबेटच्या दिशेने होतो.
1950 मध्ये एका अँग्लो-स्विस पथकाने तिबेटच्या दिशेने माना खिंडीमार्गे चढाई करत हे शिखर प्रथम सर केले होते. त्यानंतर 1953 मध्ये नंदू जयाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय गिर्यारोहकांच्या पथकानेही या शिखरावर यशस्वी चढाई केली होती.
हिमालयातील अतिउंच आणि आव्हानात्मक सीमावर्ती भागात तैनात असलेल्या आयटीबीपीच्या हिमवीरांसाठी ही मोहीम त्यांच्या उत्कृष्ट गिर्यारोहण कौशल्याचे, शारीरिक क्षमतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक ठरली आहे.
मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आयटाबीपीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर जवानांचे कौतुक करण्यात आले. “हिमवीरांनी माउंट एबी गामिन सर केले,” असा संदेश यावेळी प्रसिद्ध करण्यात आला.आयटीबीपीचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी 23 सदस्यीय पथकातील सर्व जवानांचे अभिनंदन केले. त्यांच्या अदम्य धैर्याचे कौतुक करताना त्यांनी हे यश भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांसाठी मोठी प्रेरणा असल्याचे नमूद केले.
------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी