
- आगामी 3 ते 5 ऑक्टोबरदरम्यान आयोजन
- संघाच्या 46 प्रांतांचे प्रतिनिधी होणार सहभागी
इंदूर, 25 सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक यंदा मध्यप्रदेशच्या इंदूर येथे होणार आहे. ही बैठक 3 ते 5 ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली असून, संघाच्या या बैठकीला ‘दिवाळी बैठक’ असेही संबोधले जाते. देशभरातील संघच्या सर्व 46 प्रांतांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या अंतिम टप्प्यात ही बैठक होत आहे. संघाने ऑक्टोबर 2025 मध्ये स्थापनेची 100 वर्षे पूर्ण केली. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम 20 ऑक्टोबर 2026 म्हणजेच विजयादशमीपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे इंदूर येथे होणारी ही बैठक शताब्दी वर्षातील अखेरची मोठी संघटनात्मक बैठक मानली जात आहे. या बैठकीत संघाच्या वतीने देशभर राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच शताब्दी वर्षादरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी प्रत्यक्ष पातळीवर कितपत झाली आहे, यावरही चर्चा होणार आहे. देशभरातून आलेले पदाधिकारी आपापल्या क्षेत्रातील संघटनात्मक उपक्रमांची माहिती मांडतील. त्याचबरोबर आगामी काळातील कार्ययोजनेवरही विचारमंथन केले जाणार आहे.
इंदूरमधील ही बैठक संघटनात्मकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. संघाच्या सध्याच्या संघटनात्मक रचनेत काही प्रस्तावित बदल बैठकीनंतर लागू केले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रस्तावित बदलांमध्ये ‘प्रांत प्रचारक’ व्यवस्थेऐवजी ‘संभाग प्रचारक’ व्यवस्था लागू करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय बैठकीनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.यापूर्वी जुलै महिन्यात कर्नाटकातील बेळगावी येथे संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक झाली होती. या बैठकीत संघटनात्मक उपक्रम, शाखांचा विस्तार तसेच शताब्दी वर्षाशी संबंधित कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला होता.इंदूर येथे होणाऱ्या बैठकीदरम्यान संघाच्या सर्व 46 प्रांतांचे पदाधिकारी 3 दिवस शहरात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय देशभरातून शेकडो संघ पदाधिकारी आणि स्वयंसेवकही इंदूरमध्ये दाखल होणार आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी