
- एसआयटीची सांगोला, बुलढाणा, नवी मुंबईत धडक कारवाई
मुंबई, 25 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत आणखी चार आरोपींना अटक केली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) कारवाई करत दोन मध्यस्थ आणि दोन उमेदवारांना बेड्या ठोकल्या आहेत. या नव्या अटकेमुळे या घोटाळ्यातील एकूण आरोपींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये साजिद संदे याला सांगोला, तर विजय किंगर याला बुलढाणा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोघांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना याआधी अवर सचिव अभिजीत लेंडवे, गोपनीय कक्षात काम करणारा सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यासह मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश उर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील एकूण 154 पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील 6 विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान शासकीय पदाचा गैरवापर करून, गोपनीयतेचा व निष्पक्षतेचा भंग करत आर्थिक फायद्यासाठी प्रश्नसंच अनधिकृतपणे लीक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 112, 316 (4), 316 (5), 318 (4), 328 (ब), 371 (2), 303 (2), 61 (2), 3 (5) सह 'महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, 2024' चे कलम 19 (9)(2)(3), 12 (9)(2) आणि 'भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988' मधील कलम 13 (2) व 13 (1) (अ) अन्वये गंभीर गुन्हे दाखल (FIR) करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास गुन्हे शाखा करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी