
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय गुप्ता उपस्थित राहणार
नागपूर, २५ सप्टेंबर (हि.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) पवित्र विजयादशमी उत्सव यंदा २० ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वार्षिक उद्बोधन होणार आहे. संघाच्या ट्विटर (एक्स) हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
यंदाच्या कार्यक्रमाला दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.४० वाजता रेशीमबाग, नागपूर येथे विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संजय गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर डॉ. मोहन भागवत यांचे उद्बोधन होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वर्षप्रतिपदा (गुडी-पाडवा), शिवराज्याभिषेक दिन, रक्षा बंधन, गुरु पौर्णिमा, विजयादशमी, मकरसंक्रांती असे 6 उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांच्या आयोजना मागे संघाचे स्वतःचे असे तत्त्वज्ञान आहे. नागपुरात आयोजित होणारा विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाची सांगता या कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे.
संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना केली होती. त्यामुळे विजयादशमी उत्सवाच्या दिवशी संघाचा स्थापना दिवस देखील असतो. या दिवशी सरसंघचालक स्वंयसेवकांचे मार्गदर्शन करतात. तसेच या कार्यक्रमाला समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना संघाच्या व्यासपीठावर अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. यापूर्वी 5 ऑक्टोबर 2022 रोजी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांना मुख्य अतिथी म्हणून गौरवण्यात आले होते.
तर 24 ऑक्टोबर 2023 रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित विजयादशमी कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते तसेच 2024 मध्ये इसरोचे वैज्ञानिकपद्म भूषण डॉ. के. राधाकृष्णन आणि 2025 मध्ये संघाच्या शताब्दी वर्षात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर यंदा ज्येष्ठ पत्रकार संजय गुप्ता यांना बोलावण्यात आले आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी