
नगोया(जपान), 25 सप्टेंबर (हिं.स.)। भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नेमबाजीत आणखी एका पदकाची भर घातली. रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि नीरज कुमार या भारतीय त्रिकुटाने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाने अंतिम फेरीत १७६२-९४एक्स अशी कामगिरी केली. चीनच्या १७६६-९५एक्स या गुणांपेक्षा भारतीय संघ चार गुणांनी मागे राहिला. चीनने सुवर्णपदक, तर दक्षिण कोरियाने १७५१-८७एक्स गुणांसह कांस्यपदक पटकावले.
भारताने २०२२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत याच स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, यावेळी चीनकडून भारताला आपले विजेतेपद गमवावे लागले. या रौप्यपदकासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकांची संख्या १९ झाली आहे. यात दोन सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश आहे.
ऐश्वर्य आणि नीरज वैयक्तिक अंतिम फेरीत
सांघिक स्पर्धेबरोबरच ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि नीरज कुमार यांनी वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवले आहे. ऐश्वर्यने ५८९-३४एक्स गुणांसह तिसरे स्थान मिळवले, तर नीरज ५८८-३४एक्स गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. रुद्रांक्ष पाटीलने ५८५-२६एक्स गुणांसह नववे स्थान मिळवले. त्यामुळे त्याला वैयक्तिक अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही.
ऐश्वर्यचा शानदार आंतरराष्ट्रीय प्रवास
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रतनपूर गावचा रहिवासी असलेला ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर हा ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील भारताच्या प्रमुख नेमबाजांपैकी एक आहे. त्याने २०१५ मध्ये भोपाळ येथील मध्य प्रदेश शूटिंग अकादमीत प्रशिक्षणाला सुरुवात केली. २०१९ मध्ये सुहल येथे झालेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषकात त्याने सुवर्णपदक जिंकण्यासोबतच ज्युनिअर विश्वविक्रम नोंदवला.
यानंतर २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात त्याने सुवर्णपदक जिंकले. तसेच लिमा येथे झालेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनिअर विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
ऐश्वर्यने टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०२५ मध्ये काहिरा येथील आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक, तर २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई रायफल/पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
नीरजही वैयक्तिक पदकाच्या शर्यतीत
होशियारपूरचा नीरज कुमारने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. त्याने २०२२च्या आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक कांस्यपदक जिंकले होते. २०२६च्या आशियाई रायफल/पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. तसेच सांघिक सुवर्णपदकातही त्याचे योगदान होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेत आणखी एक पदक जिंकण्याची त्याला संधी आहे.
रुद्रांक्ष पाटीलची कामगिरी
भारतीय नेमबाज रुद्रांक्ष बालासाहेब पाटीलने कमी वयातच १० मीटर एअर रायफलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी असलेला रुद्रांक्ष भारताच्या प्रमुख रायफल नेमबाजांपैकी एक असून त्याने देशासाठी अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.
रुद्रांक्षने २०२२ मध्ये कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अभिनव बिंद्रानंतर या प्रकारात वैयक्तिक विश्वविजेतेपद जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटाही मिळाला होता.
रुद्रांक्षने २०२२ मध्येच आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष सांघिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले. याशिवाय त्याने आयएसएसएफ प्रेसिडेंट्स कप, विश्वचषक आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही अनेक पदके मिळवली आहेत. २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर २०२४ मध्ये जकार्ता येथेही याच प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
२०२५ मध्ये ब्यूनस आयर्स आयएसएसएफ विश्वचषकात रुद्रांक्षने सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी २०२३ मध्ये काहिरा विश्वचषकात सुवर्णपदक, तर भोपाळ विश्वचषकात कांस्यपदक त्याच्या नावावर होते. २०२१ मध्ये लिमा आयएसएसएफ ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule