
किन्शासा, २६ सप्टेंबर (हिं.स.) मध्य आफ्रिकेतील देश, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) च्या नैऋत्य भागात एक लष्करी विमान कोसळले. या अपघातात वरिष्ठ लष्करी अधिकारी, सैनिक आणि नागरिक यांच्यासह किमान १४ जणांचा मृत्यू झाला.
विमान नैऋत्येकडील किक्विट शहरातून राजधानी किन्शासाकडे जात होते. उड्डाणादरम्यान, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि त्याने क्वांगो प्रांतातील केंगे येथे उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावपट्टी नसल्यामुळे विमान एका निवासी भागात कोसळले. काँगोचे उपराज्यपाल रेमी साकी बोकिंदा यांनी सांगितले की, केंगेमध्ये विमान उतरवण्यासाठी धावपट्टी नव्हती, त्यामुळेच विमान निवासी भागात कोसळले.
काँगोच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर-जनरल एफोमी अकेन्गे यांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेले सर्वजण मरण पावले, असे त्यांनी सांगितले. बारा मृतदेह अत्यंत जळालेले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. वैमानिकाचा मृतदेह विमानाच्या ढिगाऱ्याबाहेर सापडला.
सैन्याच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये नागरिक, दोन जनरल्ससोबत प्रवास करणाऱ्या सरकारी प्रतिनिधी मंडळाचे सदस्य आणि इतर लष्करी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक मृतदेह गंभीरपणे जळालेले होते.
अपघातानंतर, अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली. अधिकाऱ्यांनी विमानातील तांत्रिक बिघाड आणि अपघातापूर्वी उतरण्याचा प्रयत्न यासह सर्व बाबींची चौकशी सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे