
भाविकांच्या सुविधांसाठी विविध उपाययोजनांवर चर्चा
बीड, २६ सप्टेंबर (हिं.स.) : धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान, नारायणगड येथे सालाबादप्रमाणे यंदाही होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्याच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त संस्थानच्या विश्वस्त मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविक-भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सुविधांचे नियोजन करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यंदाच्या दसरा मेळाव्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच संत-महंत, आजी-माजी आमदार, आजी-माजी मंत्री आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने भाविक तसेच समाजबांधव उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी पिण्याचे पाणी, महाप्रसाद, पार्किंग, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मागील दोन वर्षांत दसरा मेळाव्यासाठी लाखो भाविकांनी नारायणगड येथे उपस्थिती लावली होती. यंदाही मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीस ह.भ.प. महंत शिवाजी महाराज, उत्तराधिकारी ह.भ.प. संभाजी महाराज, नारायणगड संस्थानचे विश्वस्त तथा माजी आमदार राजेंद्र जगताप, जे.पी. शेळके सर, अनिलदादा जगताप, दिलीपअण्णा गोरे, बळीराम गवते, सी.ए. बी.बी. जाधव, महादेव तुपे, गोवर्धन काशीद, राजाभाऊ मस्के यांच्यासह संस्थानचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्याच्या नियोजनाबाबत आवश्यक ठराव घेण्यात आले. त्यानंतर मेळाव्याच्या तयारीच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis