
लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। सन २०२६ च्या खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळाच्या निकषांनुसार Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उदगीर व जळकोट तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
उदगीर व जळकोट तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पाऊस झाला नसल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून उदगीर-जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतात्याने मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी, पंचनामे करून तातडीने मदत देण्याबाबत त्यांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले होते. आ.संजय बनसोडे यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर उदगीर व जळकोट तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
विविध सवलती व उपाययोजनांचा मार्ग मोकळा
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर संबंधित तालुक्यांमध्ये शासनाच्या दुष्काळी निकषांनुसार विविध मदत, सवलती व टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे, पाणीटंचाई निवारण, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध सवलतींची अंमलबजावणी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाकडून दुष्काळी भागातील नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करून पुढील मदत देण्याची कार्यवाही केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा
उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीपासून दिलासा मिळावा, यासाठी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शासनाने दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यापर्यंत मदत करणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी बोलताना सांगितले. उदगीर - जळकोट या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis