
नागोया (जपान), 26 सप्टेंबर, (हिं.स.) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुष कबड्डीच्या अंतिम सामन्यात, भारताने दुसऱ्या सत्रात जबरदस्त पुनरागमन करत इराणचा ४०-३४ असा पराभव केला आणि सुवर्णपदक जिंकले. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत भारत इराणपेक्षा १७-१८ अशा गुणांनी पिछाडीवर होता; मात्र विश्रांतीनंतर भारतीय संघाने आक्रमक खेळ करत सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले आणि सामना निर्णायकपणे आपल्या बाजूने झुकवला. दुसऱ्या सत्रात भारताने खेळाची तीव्रता वाढवली आणि प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली; यात सुमित आणि अर्जुन देशवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गतविजेत्या भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवत इराणला प्रतिहल्ला करण्याची फारशी संधी दिली नाही आणि सुवर्णपदक निश्चित केले. २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अत्यंत चुरशीच्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्याच्या तुलनेत, यावेळी भारताने दुसऱ्या सत्रात स्पष्ट आघाडी घेतली आणि संयमाने खेळ करत विजय साकारला.या विजयामुळे भारताच्या कबड्डीमधील गौरवशाली वारशात आणखी एका आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाची भर पडली असून, भारतीय पुरुष संघासाठी ही मोहीम अविस्मरणीय ठरली आहे.
तत्पूर्वी, महिला कबड्डी संघाने अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात इराणचा ३७-३४ असा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारताचे तिसरे सुवर्णपदक जिंकले आणि हांगझोऊ स्पर्धेत जिंकलेले विजेतेपद यशस्वीपणे राखले.
सामन्याच्या अंतिम टप्प्यात इराणने पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न केले, तरीही भारतीय खेळाडूंनी संयम राखला. सामना संपायला एक मिनिट बाकी असताना इराणला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणांची गरज होती, परंतु भारताच्या बचावपटूंनी आयनाझला रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण 'टॅकल' केला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे