
नागोया (जपान), 26 सप्टेंबर (हिं.स.) । आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये गतविजेत्या भारताने आपली लय कायम राखली आहे. 'पूल ए' मधील सलग चौथा विजय नोंदवताना जपानचा २-० ने पराभव करून भारताने पुरुष हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. अभिषेक आणि हरमनप्रीत सिंग यांनी केलेल्या गोलमुळे भारताचा विजय निश्चित झाला. सामन्यादरम्यान काही आव्हानात्मक क्षण आले असले तरी, गतविजेत्या भारताने खेळावर बऱ्याच अंशी नियंत्रण राखले आणि संयम बाळगत हा विजय मिळवला. गट फेरीतील हा सामना भारतासाठी सर्वात कठीण परीक्षा ठरेल अशी अपेक्षा होती.
या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात इंडोनेशियावर १३-१ अशा दणदणीत विजयाने केली होती आणि त्यानंतर श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा उडवला होता.त्यानंतर भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा ८-२ असा पराभव केला आणि जपानविरुद्ध २-० असा विजय मिळवून 'पूल' फेरीतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
चार सामन्यांत चार विजय मिळवून गतविजेत्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे आणि आता ते हाच विजयी फॉर्म 'नॉकआउट' फेरीतही कायम राखण्याचा प्रयत्न करतील. या विजयामुळे, अंतिम गुणतालिकेत कोणताही बदल न झाल्यास, उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे