लातूर तहसील कार्यालयात महावितरणचे विशेष किऑस्क सेंटर सुरू
लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा अधिक वेगाने आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्यासोबतच सौरऊर्जा योजनांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी महावितरणकडून ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभि
सेवा सेतू सेवा संकल्प


लातूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा अधिक वेगाने आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्यासोबतच सौरऊर्जा योजनांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी महावितरणकडून ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लातूर तहसील कार्यालयात विशेष किऑस्क सेंटर सुरू करण्यात आले आहे.

या किऑस्क सेंटरमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन दिले जात आहे. सौर योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, मिळणारे आर्थिक लाभ, सौर संच बसविण्याची कार्यपद्धती, अंदाजित खर्च आणि कर्ज सुविधांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच निवडसूचीतील सौर कंत्राटदारांच्या माध्यमातून आवश्यक माहिती व समन्वयही करून दिला जात आहे.

२४ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या किऑस्क सेंटरला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत ४३ नागरिकांनी भेट देऊन सौर योजना तसेच महावितरणच्या विविध सेवांची माहिती घेतली आहे.

या अभियानासाठी कार्यकारी अभियंता अनिरुद्ध घाटगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे प्रयत्नशील आहेत. सहाय्यक अभियंता अमोल जाधव, कनिष्ठ अभियंता रामलिंगेश्वर बावगे आणि लेखा लिपिक रवी वाळके हे प्रत्यक्ष नागरिकांना माहिती व मार्गदर्शन करत आहेत.

१७ ऑक्टोबरपर्यंत किऑस्क सेंटर सुरू राहणार

लातूर तहसील कार्यालयातील हे विशेष किऑस्क सेंटर १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. जास्तीत जास्त वीजग्राहकांनी या सेंटरला भेट देऊन सौरऊर्जा योजनांसह महावितरणच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सेवा सेतू अभियानातून विविध सेवांना गती

‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारण्यात आले आहेत. नवीन घरगुती वीजजोडणी, नादुरुस्त रोहित्र बदलणे, वीज बिलावरील नावात बदल, मंजूर भारात बदल, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण, प्रलंबित तक्रारींचे निराकरण आदी सेवांना या अभियानातून गती देण्यात येत आहे.

तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीजयंत्रणेत आवश्यकतेनुसार स्पेसर बसविणे, तांत्रिक उपाययोजना, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती यावरही भर देण्यात येत आहे. महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांनी वीजग्राहकांनी ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत एकाच छत्राखाली उपलब्ध विविध सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande