नाशिक : विविध घटनांमध्ये चौघींचा विनयभंग
नाशिक, 28 सप्टेंबर (हिं.स.)। नाशिक शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी परिचितांकडून चार महिलांचे विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनयभंगाचा पहिला प्रकार सारडा सर्कल येथे घडला. फिर्यादी पीडित महिला ही
नाशिक : विविध घटनांमध्ये चौघींचा विनयभंग


नाशिक, 28 सप्टेंबर (हिं.स.)। नाशिक शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी परिचितांकडून चार महिलांचे विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विनयभंगाचा पहिला प्रकार सारडा सर्कल येथे घडला. फिर्यादी पीडित महिला ही परिवारासोबत सारडा सर्कल येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली होती. त्यावेळी पीडितेचा खडकाळी येथे राहणारा दीर हा पीडितेच्या टेबलाजवळ आला आणि अचानक सर्वांसमोर पीडितेला मिठी मारली, तसेच स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून पीडितेचा विनयभंग केला.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंगाचा दुसरा प्रकार सिडकोत घडला. फिर्यादी महिला ही घरामध्ये झाडत होती. त्यावेळी फिर्यादीचा दीर फिर्यादीच्या घरात निर्वस्त्र आला व पीडितेशी अश्लील बोलून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून त्याने अश्लील हावभाव केले, तसेच पीडितेला मारहाण करून निघून गेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंगाचा तिसरा प्रकार सिडकोत घडला. फिर्यादीची मुलगी ही तिच्या मैत्रिणीसोबत क्लासवरून घरी येत होती. त्यावेळी फिर्यादीच्या कॉलनीत राहणारा आरोपी सौरभ राजे सोनवणे याने फिर्यादीच्या मुलीकडे पाहून अश्लील हातवारे करून तोंडातील सिगारेट पीडितेच्या दिशेने फेकली. त्यानंतर पीडितेजवळ येऊन तिच्या अंगाला स्पर्श करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. आरोपी हा पीडितेला सतत अशा पद्धतीने त्रास देतो म्हणून अंबड पोलीस ठाण्यात सौरभ सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंगाचा चौथा प्रकार श्रमिकनगर येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी श्रमिकनगर येथील हिंदी शाळेमागे असताना आरोपी अर्यमान किशोर म्हामूनकर (वय २३, रा. परमोरी, ता. दिंडोरी) याने तिला अडवून पीडितेचा हात धरून तिला जवळ ओढले व तिच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत आरोपीकडे विचारणा केली असता त्याने फिर्यादीस शिवीगाळ करून मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अर्यमान म्हामूनकर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande