
नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी करणार्या कर्मचार्यांवर तिकीटविरहित प्रवाशांच्या गटाने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी 14 जणांपैकी 10 प्रवाशांना आरपीएफच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असून, चौघे घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास हजूर साहिब नांदेड स्थानकावर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दोन तिकीट तपासणी कर्मचारी तिकीट तपासत असताना धर्माबादहून मनमाडकडे जाणार्या 17688 मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचा एक गट चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिकीट तपासणीसाठी कर्मचारी संबंधित प्रवाशांकडे गेले असता सुमारे 14 जणांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारात तिकीट तपासणी कर्मचारी आर. के. सिंह यांना प्रवाशांनी गाडीत ओढून नेल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरे तिकीट तपासणी कर्मचारी जितेंद्र कुमार यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुमारे 5.32 वाजता रेल्वेगाडी सुरू झाली. प्रकाराची माहिती मिळताच गाडीतील ट्रेन मॅनेजरने गाडी थांबविली. यानंतर प्लॅटफॉर्मवरील अन्य तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी गाडीत जाऊन संबंधित प्रवाशांना खाली उतरविण्याची कारवाई केली. यावेळी चार जण पसार झाले, तर उर्वरित 10 जणांना तिकीट निरीक्षक कार्यालयात आणण्यात आले. हल्ल्यात जखमी झालेल्या आर. के. सिंह यांना पुढील उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचा वैद्यकीय-कायदेशीर अहवाल (एमएलसी) नोंदविण्यात आला आहे.
त्यानंतर तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफने ताब्यात घेतलेल्या 10 प्रवाशांना नांदेड जीआरपी ठाण्यात तक्रारीसाठी सुपूर्द केले. त्यानुसार कर्तव्य बजावणार्या सार्वजनिक सेवकांना दुखापत करणे आणि त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे यासह बीएनएसच्या विविध लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी अधिकृत तिकीट किंवा वैध प्रवास प्राधिकरणासहच प्रवास करावा आणि तिकीट तपासणी कर्मचार्यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. रेल्वे कर्मचार्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे अथवा त्यांच्यावर हल्ला करणे यामुळे दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis