
तेहरान , 28 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम आशियात अमेरिकेसोबत दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक मोठा दावा केला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) नौदलाने स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये अमेरिकी लष्कराच्या दुसऱ्या प्रगत मानवरहित पाणबुडीवर, म्हणजेच ‘रेमस ६००’वर, ताबा मिळवल्याचा दावा इराणने केला आहे.
या संदर्भात इराणच्या सरकारी प्रसारकने रविवारी (२७ सप्टेंबर २०२६) अधिकृत निवेदन जारी केले. त्यानुसार, आयआरजीसीच्या मोहिमेदरम्यान स्ट्रॅटेजिक जलमार्गात कार्यरत असलेल्या अमेरिकी लष्कराच्या दुसऱ्या पाणबुडीला लक्ष्य करण्यात आले. इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी या उपकरणाचे वर्णन अमेरिकी लष्कराची मानवरहित पाणबुडी असे केले आहे.
अमेरिकी मानवरहित पाणबुडीवर कथित ताबा मिळवल्याबाबत आयआरजीसीने म्हटले की, हा ताबा एका समन्वयित आणि अत्यंत गुंतागुंतीच्या मोहिमेद्वारे मिळवण्यात आला. या कारवाईत इराणी लष्कराच्या गुप्तचर देखरेख आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांचा वापर करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, “ईश्वराच्या कृपेने, आयआरजीसीच्या नौदलाच्या जवानांनी गुप्तचर माहिती आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने समन्वयित आणि गुंतागुंतीची कारवाई करत स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये हेरगिरीच्या उद्देशाने तैनात करण्यात आलेल्या अमेरिकी लष्कराच्या एका प्रगत मानवरहित पाण्याखालील वाहनावर ताबा मिळवण्यात यश मिळवले.”
निवेदनानुसार, आयआरजीसीच्या नौदलाने ताब्यात घेतलेल्या अमेरिकी पाणबुडीची ओळख ‘रेमस ६००’ अशी करण्यात आली आहे. इराणी अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, ही अत्याधुनिक पाण्याखालील मानवरहित यंत्रणा असून ती अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय पाण्याखाली स्वतंत्रपणे हालचाल करू शकते.
इराणी अधिकाऱ्यांनी या पाणबुडीवर स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये इराणविरोधात हेरगिरीच्या मोहिमा राबवल्याचा आरोपही केला आहे. आयआरजीसीच्या नौदलाने ही यंत्रणा ताब्यात घेतल्यानंतर तिच्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी ती तज्ज्ञांच्या ताब्यात देण्यात आल्याचेही इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode