सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांचा राजीनामा; आता पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवणार
बेलग्रेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांनी रविवारी आपल्या पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचा दुसरा राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळ मुदतीपूर्वीच संपुष्टात आला आहे.आता २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्
सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांचा राजीनामा; आता पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवणार


बेलग्रेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांनी रविवारी आपल्या पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचा दुसरा राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळ मुदतीपूर्वीच संपुष्टात आला आहे.आता २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अचानक जाहीर करण्यात आलेल्या संसदीय निवडणुकीत त्यांच्या सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर करताना वुसिक म्हणाले, “मी राष्ट्राध्यक्षपदाच्या जबाबदारीचा राजीनामा देत आहे.” घटनात्मक प्रक्रियेनुसार त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या संसदेच्या अध्यक्षा एना ब्रनाबिक यांच्याकडे सोपवल्या आहेत. आता त्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाचा कारभार सांभाळतील.

बेलग्रेड येथील राष्ट्राध्यक्ष भवनाबाहेर जमलेल्या मोठ्या समर्थकांच्या गर्दीला संबोधित करताना वुसिक यांनी सांगितले की, त्यांच्या नऊ वर्षांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशात शांतता आणि स्थैर्य कायम राहिले.विशेष म्हणजे, वुसिक गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून सत्तेत आहेत. घटनात्मक नियमांनुसार त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नव्हती.

त्यामुळे जूनमध्येच त्यांनी पद सोडण्याचे संकेत दिले होते. सामान्य नागरिक म्हणून निवडणूक प्रचार करता यावा आणि संसदीय निवडणुकीच्या माध्यमातून आपला राजकीय प्रभाव कायम ठेवता यावा, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

वुसिक यांचा हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये नोवी साद शहरातील रेल्वे स्थानकाचे छत कोसळले होते. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेविरोधात सुरू झालेले आंदोलन लवकरच सरकारमधील कथित भ्रष्टाचाराविरोधातील व्यापक जनआक्रोश आणि सरकारकडून जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीत रूपांतरित झाले.

राजीनाम्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी वुसिक यांनी समर्थकांना संबोधित करताना म्हटले, “या सुंदर इमारतीतील ही माझी शेवटची संध्याकाळ आहे. मात्र, मी आशावादाने भविष्याकडे पाहत आहे. नवा विजय आपली वाट पाहत आहे.”

सर्बियाची संसद या महिन्याच्या सुरुवातीला विसर्जित करण्यात आली असून, आता २५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकही तीन महिन्यांच्या आत घेण्यात येणार आहे.पद सोडण्याच्या काही वेळ आधी वुसिक यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत ४९ जणांना माफी दिली. यामध्ये सरकारविरोधी आंदोलनांशी संबंधित २३ जणांचाही समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande