अफगाण महिला पत्रकाराला ख्वाजा आसिफ यांचा वादग्रस्त इशारा; सोशल मीडियावर टीका
इस्लामाबाद , 28 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर सोशल मीडियावर सातत्याने टीका होत आहे. एका अफगाण महिला पत्रकारासोबत झालेल्या संभाषणादरम्यान केलेल्या एका इशाऱ्यावरून त्यांच्यावर ही टीका होत आहे. या पत्रकाराने तालिबान
अफगाण महिला पत्रकाराला ख्वाजा आसिफ यांचा वादग्रस्त इशारा; सोशल मीडियावर टीका


इस्लामाबाद , 28 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर सोशल मीडियावर सातत्याने टीका होत आहे. एका अफगाण महिला पत्रकारासोबत झालेल्या संभाषणादरम्यान केलेल्या एका इशाऱ्यावरून त्यांच्यावर ही टीका होत आहे. या पत्रकाराने तालिबानसोबत पाकिस्तानचे संबंध आणि अफगाण महिलांशी होत असलेल्या वर्तणुकीबाबत आसिफ यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८१व्या अधिवेशनादरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अफगाण पत्रकार संरक्षणमंत्री आसिफ यांना विचारताना दिसत आहेत, “आता तालिबानसाठी तुमचा संदेश काय आहे? त्यांनी अफगाण महिलांबाबतचे आपले धोरण बदलायला हवे का? सुरुवातीपासूनच पाकिस्तानने त्यांना हे का शिकवले नाही?” याचदरम्यान आसिफ यांनी पत्रकाराला थांबवले आणि तिच्या प्रश्नांना थेट उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी पत्रकाराच्या पोशाखाकडे इशारा करत म्हटले, “तिथे अशा प्रकारे परत जाऊ नका, नाहीतर ते…” असे म्हणत त्यांनी मान वळवून एक इशारा केला. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी करता आलेली नाही.

दरम्यान, आसिफ यांनी केलेल्या इशाऱ्याच्या पद्धतीवरून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पत्रकार अफगाणिस्तानात परत गेल्यास तिच्या जीवाला धोका होऊ शकतो, असा अर्थ या इशाऱ्यातून काढला जात असल्याचे काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. पत्रकाराचे म्हणणे ऐकून आसिफ आणि त्यांच्यासोबत उभे असलेले काही जण हसल्याबद्दलही त्यांच्यावर टीका करण्यात आली.

दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. गुरुवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानातील १० ठिकाणांवर अचूक हवाई आणि ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातून आदल्या दिवशी करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.

पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, तरार यांनी सांगितले की, ज्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, त्यांचा कथितपणे ड्रोन प्रक्षेपण आणि ड्रोन साठवण्यासाठी वापर केला जात होता. त्यांनी या कारवाईचे वर्णन अचूक आणि विचारपूर्वक करण्यात आलेली कारवाई असे केले.तसेच, पाकिस्तानवरील हल्ल्यांच्या प्रयत्नांशी थेट संबंधित असल्याचे ओळखण्यात आलेल्या लष्करी ठिकाणांपुरतेच हे हल्ले मर्यादित होते, असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande