
नागोया (जपान), 28 सप्टेंबर (हिं.स.)आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीत भारताच्या यशवीर सिंग आणि रोहित यादव यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदके जिंकली. यशवीरने आपल्या अंतिम प्रयत्नात ८५.७२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागेने ८८.५५ मीटर अंतरापर्यंत भाला फेकून सुवर्णपदक पटकावले; त्यानेही आपल्या अंतिम प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८०.२९ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह चौथे स्थान मिळवले.
यशवीर अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानावर होता, पण ८५.७२ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह त्याने रौप्यपदकाचे स्थान गाठले. या भारतीय खेळाडूने स्पर्धेची सुरुवात ८३.५६ मीटरच्या थ्रोने केली आणि संपूर्ण स्पर्धेत तो अव्वल तीन खेळाडूंमध्ये राहिला; त्यानंतर अंतिम प्रयत्नात त्याने आपली कामगिरी अधिक सुधारली. रोहित यादवने ८४.३५ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक निश्चित केले. त्याने ७७.२५ मीटरने सुरुवात केली आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीत ८२.४० मीटर व तिसऱ्या फेरीत ८४.३५ मीटरपर्यंत कामगिरी सुधारली.रोहितचा अंतिम प्रयत्न 'फाऊल' ठरला, पण ८४.३५ मीटरची त्याची कामगिरी त्याला पदक मिळवून देण्यासाठी पुरेश ठरली.
पाथिरागेने ७३.५३ मीटरने स्पर्धेची सुरुवात केली होती. पण चौथ्या फेरीत ८८.३३ मीटरचा थ्रो करून त्याने आघाडी घेतली आणि त्यानंतर अंतिम प्रयत्नात ८८.५५ मीटरपर्यंत कामगिरी सुधारली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे