
बंगळुरू, 28 सप्टेंबर (हिं.स.)गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने 'वुमेन्स प्रीमियर लीग' (डब्ल्यूपीएल) २०२७ हंगामाच्या तयारीला सुरुवात करताना १३ क्रिकेटपटूंना संघात कायम ठेवले आहे आणि चार क्रिकेटपटू मुक्त केले आहे.
५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव करत डब्ल्यूपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर, आरसीबी आता एका अविस्मरणीय २०२६ हंगामाच्या पार्श्वभूमीवर नवीन मोहिमेसाठी सज्ज होत आहे. विजेतेपद मिळवून देणाऱ्या संघाचा मुख्य गाभा कायम राखल्यामुळे, आता आगामी हंगामापूर्वी आपला संघ अधिक बळकट करण्यावर आरसीबीचा भर असेल.
अंतिम सामन्यात, आरसीबीने २०४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य यशस्वीपणे गाठले आणि डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यातील सर्वात मोठ्या यशस्वी 'रन चेस'ची नोंद केली. स्मृती मानधनाने ४१ चेंडूंमध्ये शानदार ८७ धावांची खेळी करत संघाचे नेतृत्व केले, तर जॉर्जिया व्होलने ७९ धावांची वेगवान खेळी करत तिला उत्तम साथ दिली; या कामगिरीच्या जोरावर आरसीबीने सहा गडी राखून अविस्मरणीय विजय मिळवला.
डब्ल्यूपीएल २०२७: RCB ने कायम ठेवलेले क्रिकेटपटू: अरुंधती रेड्डी, लॉरेन बेल, प्रत्युषा कुमार, रिचा घोष, स्मृती मानधना, एलिस पेरी, नादिन डी क्लर्क, प्रेमा रावत, सायली सतघरे, जॉर्जिया व्होल, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयांका पाटील.
डब्ल्यूपीएल २०२७: RCB ने मुक्त केलेले क्रिकेटपटू: ग्रेस हॅरिस, लिन्सी स्मिथ, गौतमी नाईक, दयालन हेमलता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे