
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका), 28 सप्टेंबर (हिं.स.) । आगामी ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने कागिसो रबाडाचा आपल्या प्राथमिक संघात समावेश केला आहे. पहिल्या सामन्यासाठी त्याची उपलब्धता तपासण्याकरिता पुढील आठवड्यात संघांतर्गत सामना खेळवला जाईल.
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून रबाडा सध्या सावरत आहे.लुंगी एनगिडी, ओटनिल बार्टमन आणि क्वेना मफाका हे खेळाडूही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहेत, मात्र त्यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. 'क्रिकेट दक्षिण आफ्रिका'शी केंद्रीय करार नसलेल्या एनरिक नॉर्टजेचा विस्तारित संघात समावेश करण्यात आला असून, मार्च २०२३ नंतर तो पुन्हा कसोटी सामना खेळण्याच्या तयारीत आहे. या संघात सात वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून दुखापतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जेराल्ड कोएत्झीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये कसोटी सामना खेळला होता. कोर्बिन बॉश, मार्को जान्सेन, विआन मुल्डर आणि डेन पॅटरसन हे वेगवान गोलंदाजीचे इतर पर्याय आहेत. संघामधील एकमेव नवोदित क्रिकेटपटू म्हणजे मार्केस ॲकरमन आहे. त्याने 'दक्षिण आफ्रिका अ' संघासाठी १००० हून अधिक धावा केल्या आहेत. तो टोनी डी झोरझी, ट्रिस्टन स्टब्स आणि मुल्डर यांच्यासोबत फलंदाजीच्या पहिल्या तीन क्रमांकांसाठी स्पर्धा करेल. अलीकडील कामगिरी पाहता ॲकरमन या स्पर्धेत इतरांपेक्षा आघाडीवर राहू शकतो.
दक्षिण आफ्रिकेने केशव महाराज, सायमन हार्मर आणि सेनुरन मुथुसामी या तीन फिरकी गोलंदाजांचीही निवड केली आहे; हे तिघेही मागील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चक्रात संघाचा भाग होते.हंगामाच्या सुरुवातीच्या काळात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला काही प्रमाणात अनुकूल असण्याची शक्यता आहे, विशेषतः तिन्ही कसोटी सामने किनारपट्टीवरील मैदानांवर होणार असल्याने, दक्षिण आफ्रिका आपल्या अंतिम अकरा क्रिकेटपटू्ंच्या संघात तीनपैकी दोन फिरकी गोलंदाजांना खेळवण्याचा विचार करू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे