कुंभमेळा अकबराने सुरू केल्याचा अपप्रचार हाणून पाडणार : महंत अनिकेत शास्त्री
कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेवर ५०० पानी अहवाल सादर करणार नाशिक, २८ सप्टेंबर (हिं.स.) : कुंभमेळा अकबराने सुरू केला, असा काही डाव्या विचारवंतांकडून केला जाणारा दावा चुकीचा असल्याचे सांगत, त्याचे खंडन करण्यासाठी वेद, पुराणे, शिवपुराण तसेच उपलब्ध ऐत
Will debunk the false propaganda


कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेवर ५०० पानी अहवाल सादर करणार

नाशिक, २८ सप्टेंबर (हिं.स.) : कुंभमेळा अकबराने सुरू केला, असा काही डाव्या विचारवंतांकडून केला जाणारा दावा चुकीचा असल्याचे सांगत, त्याचे खंडन करण्यासाठी वेद, पुराणे, शिवपुराण तसेच उपलब्ध ऐतिहासिक व शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे सुमारे ५०० पानी सर्वसमावेशक अहवाल तयार करून केंद्र व राज्य शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी केले.

कुंभमेळा हा ५०० वर्षांपूर्वी सुरू झालेला नसून त्याची परंपरा प्राचीन असल्याचा दावा त्यांनी केला. सनातन वैदिक धर्मपरंपरेचे शास्त्रशुद्ध चिंतन आणि जागतिक पातळीवर हिंदू समाजाला प्रमाणाधारित धर्मशास्त्रीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘ज्ञानकुंभ’ संमेलनात ते बोलत होते.

महंत अनिकेत शास्त्री देशपांडे म्हणाले की, सनातन धर्माच्या परंपरांबाबत विविध दावे केले जात असून, कुंभमेळ्याच्या इतिहासाबाबतही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कुंभमेळ्याची परंपरा आणि त्यामागील धार्मिक संदर्भ वेद, पुराणे व शिवपुराणात आढळतात, असा दावा त्यांनी केला. या संदर्भातील ऐतिहासिक व शास्त्रीय पुरावे एकत्रित करून त्याचा सविस्तर अभ्यास अहवालाच्या माध्यमातून शासनासमोर मांडण्यात येईल. यासाठी साधू-महंत एकत्र आले असून, संबंधित दाव्यांना पुराव्यांच्या आधारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सनातन धर्माच्या परंपरा शास्त्रोक्त पद्धतीने जपल्या जाव्यात तसेच कुंभमेळ्यातील ध्वजारोहण आणि कुंभविधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडावेत, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘आम्ही सर्व एक आहोत. यामध्ये कोणताही वाद, जातिवाद, धर्मवाद किंवा प्रांतवाद नाही,’ असा एकात्मतेचा संदेश देत या ज्ञानकुंभाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. सनातन वैदिक धर्मपरंपरा, शास्त्रशुद्ध चिंतन आणि धर्मशास्त्रीय विषयांवर संमेलनात चर्चा करण्यात आली.

यावेळी महंत भक्तिचरणदास महाराज, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, सुनील घनवट, लक्ष्मण सावजी, आकाश छाजेड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

आखाडे आणि महंतांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने काम करावे

वृंदावनधाम येथील जगद्गुरू शंकराचार्य दीक्षित नैष्ठिक संन्यासी स्वामी अक्षय्यानंद महाराज यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत प्रशासनाने आखाडे व महंतांशी समन्वय ठेवण्याची गरज व्यक्त केली. प्रशासनाने आखाडे आणि महंतांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे, असे त्यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे महामंडलेश्वर १००८ महंत शंकरानंद सरस्वती महाराज (भगवान बाबा) यांनी आखाड्यांच्या परंपरेबाबत भूमिका स्पष्ट केली. परंपरेनुसार देशात १३ आखाडे अस्तित्वात असून नवीन आखाडा तयार करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही नव्या आखाड्याला शासन किंवा प्रशासन मान्यता देऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

शाहीस्नानाची वेळ आणि कालावधी परंपरेनुसार निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. सनातन परंपरेत लिंगभेद मानला जात नसून विद्यमान आखाड्यांमध्ये महिलांचाही सहभाग आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र आखाडा निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्र्यंबकेश्वरची नागा परंपरा अखंडपणे सुरू राहणार असून, या ज्ञानकुंभाच्या माध्यमातून राष्ट्र एकसंध ठेवण्याचे कार्य केले जाईल, असा विश्वास भगवान बाबा यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्यात परधर्मीयांना प्रवेश नको : रणजीत सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी कुंभमेळ्याच्या पावित्र्याचा मुद्दा उपस्थित केला. हिंदूंच्या या धार्मिक उत्सवात इतर धर्मीयांना प्रवेश दिला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. याबाबत संत-महंतांनी स्पष्ट आदेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या दोन दिवसीय ज्ञानकुंभ संमेलनासाठी श्रीकाशी विद्वद धर्मपरिषद, अखिल भारत हिंदू महासभा, आखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, नाशिक पुरोहित संघ, आध्यात्मिक आघाडी, सनातन संस्थांसह विविध धार्मिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संमेलनात सनातन धर्मपरंपरा, कुंभमेळ्याची परंपरा, आखाड्यांची रचना, धार्मिक विधी, प्रशासनाचे नियोजन आणि विविध धर्मशास्त्रीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande