
रत्नागिरी, 29 सप्टेंबर (हिं.स.) । अंमली पदार्थविरोधी मोहिमेत जिल्हा पोलीस दलाने २० दिवसांत २५ गुन्हे दाखल करून ३५ आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मनुज जिंदल होते. श्री. बगाटे यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान २२ ग्रॅम ब्राऊन शुगर (हिरॉईन) आणि २ हजार ७८५ किलो गांजा जप्त करण्यात आला. मागील वर्षभरात दाखल १२४ गुन्ह्यांसह आतापर्यंत एकूण ६० कारवायांमध्ये ८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गांजा व ब्राऊन शुगरच्या सेवनाचे प्रमाण नेपाळी कामगारांमध्ये अधिक आढळून येत असल्याने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने बोटींची सखोल तपासणी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामसभा आणि सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातही व्यसनमुक्तीसाठी जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करी व सेवनाविरोधात सर्व यंत्रणांनी अधिक आक्रमक भूमिका घेत समन्वय राखून काम करावे. मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक बोटीची मत्स्यव्यवसाय विभागाने तत्काळ नोंदणी पूर्ण करून अहवाल सादर करावा. एमआयडीसी, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांची अचानक तपासणी करावी.
केंद्र आणि राज्य शासन या मोहिमेवर थेट लक्ष ठेवून असल्याने सर्व विभागांनी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कारवाई आणि जनजागृतीवर भर द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले. सन २०२९ पर्यंत देशाला नशामुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन मोहीम राबवावी, तर बंदर विभागाने पोलीस व उत्पादन शुल्क यंत्रणेला सोबत घेऊन नियमित तपासण्या कराव्यात. अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रित व बंदी असलेल्या औषधांचा नशेसाठी अवैध वापर होतो का, यावर करडी नजर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.
बैठकीला प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह क्षेत्रीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
महसूल व दंडाधिकारी स्तरावरही अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत असून, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत एकाच दिवसात सहा समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यामध्ये सचिन राजाराम म्हापूसकर, अरमान लियाकत धामस्कर, नजब असीफ मिरजकर, मस्तान मकदूम शेख, फुरकान यासिन फणसोपकर आणि अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर यांचा समावेश आहे. २०२३ पासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत प्रांताधिकारी देसाई यांनी आजअखेर एकूण २१ जणांवर हद्दपारीची धडक कारवाई केली असून, प्रशासनाच्या या आक्रमक पावलांमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी