
जळगाव, 29 सप्टेंबर, (हिं.स.) रावेर भूमी अभिलेख कार्यालयामधील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मोजणी प्रकरणांमध्ये झालेला मनमानी कारभार, कामातील दिरंगाई आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश नाशिक येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या सहायक संचालकांकडून जारी करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रावेर भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांच्या मोजणी प्रकरणांची कामे वेळेवर होत नसल्याबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची आमदार अमोल जावळे यांनी दखल घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. जनतेच्या प्रश्नावर आमदार जावळे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी लागली.आमदार जावळे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे सहायक संचालक सागरे यांनी गत आठवड्यात दुपारी रावेर भूमी अभिलेख कार्यालयास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयीन कामकाजाची आणि दप्तराची कसून तपासणी केली.या तपासणीदरम्यान रेकॉर्ड प्रमुख धनराज लहरीया आणि भूमापक अमोल पालवे यांनी शासकीय कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचे व कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. या खात्रीशीर अहवालानंतर दोघाही दोषी कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर