पश्चिम बंगाल : माजी मंत्र्यांसह 15 ठिकाणी ईडीची छापेमारी
तब्बल 60 कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी कोलकाता, 29 सप्टेंबर (हिं.स.) दुर्गापूजा प्रिव्ह्यू शोच्या नावाखाली युनेस्कोच्या नावाचा कथित गैरवापर करून 50 ते 60 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकात्यात मो
ईडी लोगो संग्रहित फोटो


तब्बल 60 कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी

कोलकाता, 29 सप्टेंबर (हिं.स.) दुर्गापूजा प्रिव्ह्यू शोच्या नावाखाली युनेस्कोच्या नावाचा कथित गैरवापर करून 50 ते 60 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकात्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने मंगळवारी पहाटे पश्चिम बंगालचे माजी मंत्री इंद्रनील सेन आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित सुमारे 15 ठिकाणी छापेमारी केली.

ईडीच्या पथकांनी कसबा येथील माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या निवासस्थानासह हिंदुस्तान पार्क, हायलँड पार्क आदी ठिकाणी धनशोधन प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 17 अंतर्गत शोधमोहीम राबवली. ही कारवाई ‘मास आर्ट’ नावाच्या संस्थेने आयोजित केलेल्या ‘दुर्गापूजा प्रिव्ह्यू शो’मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचा भाग आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, 2021 मध्ये कोलकात्यातील दुर्गापूजेला युनेस्कोकडून ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

युनेस्कोच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप

तपासात समोर आलेल्या आरोपांनुसार, संस्थेने कोणतीही अधिकृत परवानगी नसताना युनेस्कोचे नाव आणि लोगो वापरला आणि स्वतःला युनेस्कोची अधिकृत भागीदार संस्था असल्याचे भासवले. ‘मास आर्ट’ने कोलकात्यातील 24 प्रमुख दुर्गापूजा मंडपांना युनेस्कोकडून निवडण्यात आल्याचा दावा करत प्रिव्ह्यू शोसाठी नागरिकांना 1749 रुपयांपासून 5499 रुपयांपर्यंतचे पास विकल्याचा आरोप आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, 2022 ते 2024 या कालावधीत या प्रक्रियेत सुमारे 1.14 लाख लोकांनी नोंदणी केली. युनेस्कोच्या नावाचा वापर करून जमा करण्यात आलेल्या सुमारे 50 ते 60 कोटी रुपयांच्या रकमेचा कथितरित्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर करण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे.

जूनमध्ये तक्रार दाखल

या प्रकरणी जून महिन्यातच बहूबाजार पोलीस ठाण्यात माजी मंत्री इंद्रनील सेन, त्यांच्या पत्नी मधुचंदा सेन आणि ‘मास आर्ट’विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.आता ईडीकडून प्रिव्ह्यू शोच्या कथित बनावट पासच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम कोणत्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande