रेवंत रेड्डींच्या राम-शिवावरील वक्तव्यावरून वाद; भाजपची तीव्र टीका
हैदराबाद, 29 सप्टेंबर (हिं.स.) : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक व राजकीय ओळखींची तुलना करत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. भगवान राम हे श्रीमंतांचे, तर भगवान शिव हे गरीबांचे देव असल्या
रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री तेलंगणा


हैदराबाद, 29 सप्टेंबर (हिं.स.) : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक व राजकीय ओळखींची तुलना करत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. भगवान राम हे श्रीमंतांचे, तर भगवान शिव हे गरीबांचे देव असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, राजकीय फायद्यासाठी धार्मिक व सामाजिक विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

एका माध्यम कार्यक्रमादरम्यान रेवंत रेड्डी यांनी भाजपकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या ‘जय श्री राम’ घोषणेचा संदर्भ घेत प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते त्याचप्रमाणे ‘हर हर महादेव’चा जयघोष का करत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

रेड्डी म्हणाले की, आम्ही द्रविड आहोत, तर ते आर्य आहेत. आम्ही भगवान शिवाचे भक्त आहोत, तर ते भगवान रामाचे भक्त आहेत. भगवान शिव हे गरीबांचे, तर भगवान राम हे श्रीमंतांचे देव असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, दोन्ही देवतांची लोक पूजा करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.उत्तर आणि दक्षिण भारताच्या राजकीय संस्कृतींमध्ये मोठे अंतर असल्याच्या आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ त्यांनी ही मते मांडली. लोकसभा मतदारसंघांच्या आगामी परिसीमन प्रक्रियेबाबतही रेड्डी यांनी चिंता व्यक्त केली. लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची संख्या वाढल्यास दक्षिणेकडील राज्यांचे राजकीय महत्त्व बदलू शकते, असा युक्तिवाद त्यांनी केला.

भाजपची तीव्र प्रतिक्रिया

रेड्डी यांच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. रेड्डी हे भगवान शिव आणि भगवान राम यांच्यात राजकीय विभाजनाची रेषा आखत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काशी विश्वनाथ मंदिराशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध तसेच त्यांच्या वेमुलवाडा दौऱ्याचा संदर्भ देत संजय कुमार यांनी रेड्डी यांच्या या दाव्याला विरोध केला की भाजपचे नेते भगवान शिवाचे नाव घेत नाहीत.संजय कुमार म्हणाले की, रेवंत रेड्डी यांनी यापूर्वी ‘मुस्लिम म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे मुस्लिम’ असे म्हटले होते. आता ते भगवान राम आणि भगवान शिव यांच्यातही राजकीय रेषा आखत आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेड्डी यांनी वेमुलवाडा येथील ‘दक्षिण काशी’ आणि भद्राचलम येथील ‘दक्षिण अयोध्या’ यांचा विचार करावा आणि भगवान राम व भगवान शिव यांना उत्तर व दक्षिण भारताच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करू नये असे संजय कुमार म्हणाले.धार्मिक व प्रादेशिक ओळखींचा वापर राजकीय लामबंदीसाठी केला जात असल्याचा आरोपही भाजप नेत्याने केला. हिंदू परंपरांकडे भौगोलिक किंवा सामाजिक आधारावर विभागणीच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे आवाहन त्यांनी रेवंत रेड्डी यांना केले आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande