
याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर (हिं.स.) : निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संबंधित याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, ज्ञानेश कुमार यांनी अन्य दोन निवडणूक आयुक्त—सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी—यांची मंजुरी न घेता भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) वतीने एकतर्फी निर्णय घेतले.वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी मंगळवारी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर ही याचिका मांडली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर त्यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणीसाठी यादी करण्याची मागणी केली.
विकास सिंह यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, कायद्यानुसार बहुसदस्यीय आयोगातील निर्णय हे एकमताने किंवा बहुमताने घेतले जाणे अपेक्षित आहे. बहुसदस्यीय आयोग स्थापन करण्यामागील उद्देश आणि कायद्यातील तरतूदही अशीच आहे की, निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतला जावा. मात्र, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम केले आहे, ते पाहता एसआयआरच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने प्रत्यक्षात कोणताही निर्णय घेतला होता की नाही, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे सिंह यांनी न्यायालयाला सांगितले.
जर आयोगाने एकमताने निर्णय घेतला नसेल, तर न्यायालयाने दिलेला निर्णयही आयोगाचा निर्णय असल्याच्या आधारावर दिला गेला आहे. त्यामुळे हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी