थायलंडमध्ये पुराचा हाहाकार; मृतांचा आकडा २३ वर, ७ लाख लोक प्रभावित
बँकॉक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।थायलंडमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सरकारने आज, मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे बँकॉकमध्ये आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती प्रतिबंध आणि निवारण विभागाच्या (डी
थायलंडमध्ये पुराचा हाहाकार; मृतांचा आकडा २३ वर, ७ लाख लोक प्रभावित


बँकॉक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।थायलंडमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सरकारने आज, मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे बँकॉकमध्ये आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे.

आपत्ती प्रतिबंध आणि निवारण विभागाच्या (डीडीपीएम) माहितीनुसार, या चार जणांच्या मृत्यूमुळे थायलंडमध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे. बँकॉकमध्ये पुरामुळे सुमारे सात लाख लोक प्रभावित झाले आहेत. बँकॉकमध्ये सलग ४८ तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तीन दिवस उलटूनही शहरातील काही भाग अद्याप पाण्याखाली आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजधानीतील २३० हून अधिक निवारा केंद्रांमध्ये सुमारे ७ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे.

डीडीपीएमने एका निवेदनात म्हटले आहे की, थायलंडमधील एकूण ७७ पैकी २९ प्रांतांना पुराचा फटका बसला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. बँकॉक आणि समुद्रादरम्यान असलेल्या समुत प्राकान प्रांतात आठ जणांचा, तर पूर्वेकडील सा काएओ प्रांतात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बँकॉकच्या आग्नेय दिशेला असलेल्या चंथाबुरी तसेच राजधानीच्या उत्तरेला असलेल्या अयुथ्या आणि साराबुरी या प्रांतांमध्येही काही जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

बँकॉकमधून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये वाहने पूर्णपणे पाण्यात बुडालेली दिसत आहेत. सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. पुरामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. थायलंडमध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, बँकॉकमधील अनेक रहिवाशांच्या मते, यंदाचा पूर यापूर्वी आलेल्या पुरांच्या तुलनेत अधिक गंभीर आहे.

बँकॉक शहराची स्थापना पूर्वी दलदलीच्या जमिनीवर करण्यात आली होती आणि शहरात कालव्यांचे मोठे जाळे आहे. मुसळधार पावसामुळे यातील अनेक कालवे दुथडी भरून वाहत आहेत.पाणी उपसण्यासाठीची केंद्रे गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. मात्र, बँकॉकचे गव्हर्नर चाडचार्ट सिट्टीपुंट यांनी रविवारी सांगितले की, शहरातील पाणी पूर्णपणे ओसरण्यासाठी एक आठवड्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो.

वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, जीवाश्म इंधनाच्या उत्सर्जनामुळे जागतिक तापमानवाढ जसजशी वाढत जाईल, तसतशी पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या घटनांची तीव्रता आणि वारंवारताही वाढण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande