मध्यपूर्वेतील युद्धाचा इराणला मोठा फटका; रियाल विक्रमी नीचांकी पातळीवर
तेहरान, 29 सप्टेंबर (हिं.स.)।मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे चलन रियाल मंगळवारी पुन्हा एकदा विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले. तेहरानमधील व्यापाऱ्यांनी एका अमेरिकी डॉलरच्या बदल्यात २५ लाखांहून अधिक रियालचा विनिमय केला. मध्यप
मध्यपूर्वेतील युद्धाचा इराणला मोठा फटका; रियाल विक्रमी नीचांकी पातळीवर


तेहरान, 29 सप्टेंबर (हिं.स.)।मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे चलन रियाल मंगळवारी पुन्हा एकदा विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले. तेहरानमधील व्यापाऱ्यांनी एका अमेरिकी डॉलरच्या बदल्यात २५ लाखांहून अधिक रियालचा विनिमय केला. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे इराणची अर्थव्यवस्था किती कमकुवत झाली आहे, याचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.

यापूर्वी २ सप्टेंबर रोजी रियालची किंमत प्रति डॉलर २२ लाख रियालपर्यंत घसरली होती. अवघ्या २७ दिवसांनंतर इराणच्या चलनाने पुन्हा एक नवा विक्रम नोंदवला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणी चलन सातत्याने नव्या नीचांकी पातळीवर जात आहे. प्रतिबंध, व्यापारातील अडथळे आणि वाढता प्रादेशिक तणाव यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत असतानाच चलनात ही घसरण झाली आहे.

दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेसोबतची अप्रत्यक्ष चर्चा आता अधिक गंभीर टप्प्यात पोहोचल्याचे सांगितले आहे. या चर्चेचा मुख्य मुद्दा म्हणजे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा खुला करणे हा आहे.

अराघची यांनी इराणी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कतारचे मध्यस्थ लवकरच या मुद्द्यावर अमेरिकी प्रतिनिधींशी पुन्हा चर्चा करणार आहेत. अमेरिकेकडून प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तेहरानमध्ये पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.न्यूयॉर्कहून रवाना होण्यापूर्वी अराघची यांनी हे वक्तव्य केले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते न्यूयॉर्कमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि कतारच्या मध्यस्थांचीही भेट घेतली.

अमेरिकी आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराण आणि अमेरिकेतील संघर्ष संपवण्यासाठी तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा खुला करण्यासाठी मध्यस्थांकडून करार घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच आठवड्यात इराणचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. या प्रस्तावात अमेरिकी नाकेबंदी हटवणे, इराणची गोठवलेली संपत्ती मुक्त करणे आणि इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंधांमध्ये सवलत देणे, अशा अनेक अटींचा समावेश होता.या अटींवर सहमती झाल्यास सात दिवसांच्या आत स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा खुला करण्याची तयारी असल्याचे इराणने म्हटले होते.

दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (आयआरजीसी) प्रवक्ते जनरल होसैन मोहेब्बी यांनी मंगळवारी अमेरिकी नागरिकांना युद्धाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेत त्यांनी अमेरिकी नागरिकांनी आपल्या सरकारवर दबाव आणावा, असे सांगितले.युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अमेरिकेने आपला पराभव स्वीकारून मध्यपूर्वेतून माघार घेणे, असा दावा मोहेब्बी यांनी केला. तसेच, इराणच्या अणुकार्यक्रमाचा वापर अमेरिका इराणच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचे कारण म्हणून करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, ट्रम्प आणि त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इराणची अर्थव्यवस्था दीर्घकाळ युद्धाचा दबाव सहन करू शकत नाही. युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हे युद्ध काही आठवड्यांत संपेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.नंतर ट्रम्प यांनी हे युद्ध कदाचित अमेरिकेतील नोव्हेंबरमधील निवडणुकांनंतर संपेल, असे म्हटले. दरम्यान, युद्धामुळे इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम अमेरिकी मतदारांमध्येही दिसून येत असल्याचे समोर आले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande