इमरान खान यांच्या सुटकेसाठी सरकारकडून डीलची ऑफर ? मुलगा कासिमचा दावा
इस्लामाबाद, 29 सप्टेंबर (हिं.स.)। इमरान खान यांचा मुलगा कासिम याने एका मुलाखतीदरम्यान माजी पाकिस्तानी पंतप्रधानांचा खटला मिटवण्यासाठी आणि त्यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी शाहबाज सरकार एक तोडगा काढू शकते, असे संकेत दिले आहेत. कासिमने म्हटले आहे क
इमरान खान यांच्या सुटकेसाठी सरकारकडून डीलची ऑफर?मुलगा कासिमचा मोठा दावा


इस्लामाबाद, 29 सप्टेंबर (हिं.स.)। इमरान खान यांचा मुलगा कासिम याने एका मुलाखतीदरम्यान माजी पाकिस्तानी पंतप्रधानांचा खटला मिटवण्यासाठी आणि त्यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी शाहबाज सरकार एक तोडगा काढू शकते, असे संकेत दिले आहेत. कासिमने म्हटले आहे की, सध्या वडिलांची भेट होईल, अशी कल्पनाही करणे त्याला शक्य नाही. मात्र, त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करण्यास तयार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी इमरान खान यांच्यावरील खटले निकाली काढण्यासाठी आणि त्यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी कोणतीही डील ऑफर केली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कासिमने सांगितले, “जर मी केवळ माझ्या स्वार्थाचा विचार केला, तर मला वाटेल की त्यांनी ही डील स्वीकारावी. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याची मला माहिती नाही.” गेल्या सात महिन्यांहून अधिक काळापासून त्याचा वडिलांशी संवाद झालेला नाही. कासिमने पुढे म्हटले की, त्याच्या वडिलांकडून कोणत्याही डीलला होकार मिळेल, अशी त्याला अपेक्षा नाही. कारण इमरान खान यांच्यासोबत अनेक राजकीय नेतेही तुरुंगात आहेत. त्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे.

“मला माझ्या वडिलांशी बोलायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले होते. तसेच न्यायालयाने आणखी काही निर्देश दिले होते; मात्र त्यापैकी अनेकांचे पालन करण्यात आलेले नाही,” असे कासिमने सांगितले. वडिलांबद्दल बोलताना कासिमने म्हटले की, “ते अत्यंत दृढ इच्छाशक्ती असलेले व्यक्ती आहेत. अनेक राजकीय कैदी तुरुंगात आहेत आणि त्यात आमच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणत्याही डीलला होकार देणे कठीण आहे.”

गेल्या काही काळापासून तुरुंगातील इमरान खान यांच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या बातम्या समोर आल्या असून, त्यांच्या दृष्टीवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना अनेकदा रुग्णालयात नेण्यात आल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान, इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाकडून सरकारवर सातत्याने दबाव आणला जात आहे. अलीकडेच देशव्यापी आंदोलनाची योजनाही आखण्यात आली होती. मात्र, सरकारसोबत चर्चेची शक्यता निर्माण झाल्यानंतर हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.

इमरान खान सध्या १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि वकिलांनी आरोप केला आहे की, इमरान खान यांना एका छोट्या कोठडीत ठेवण्यात आले असून ते दिवसातील सुमारे २३ तास त्याच कोठडीत असतात. मात्र, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande