
नेपिडो, 29 सप्टेंबर (हिं.स.)।म्यानमारच्या लष्कराने शक्तिशाली बंडखोर गटाच्या ताब्यात असलेल्या भागातील एका बाजाराजवळ भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान ४९ जणांचा मृत्यू, तर ५८ जण जखमी झाले आहेत. हवाई हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
म्यानमारच्या पश्चिमेकडील रखाइन राज्यात झालेला हा हल्ला देशभरातील लोकशाही समर्थक बंडखोर गट आणि वांशिक सशस्त्र संघटनांविरोधात करण्यात येत असलेल्या घातक हवाई हल्ल्यांच्या मालिकेतील ताजी घटना आहे. सोमवारी क्याउक्ताव टाउनशिपमध्ये हा हल्ला झाला. हे ठिकाण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मांडलेपासून सुमारे ३४० किलोमीटर पश्चिमेला आहे. क्याउक्ताववर रखाइनमधील शक्तिशाली वांशिक सशस्त्र संघटना ‘अराकान आर्मी’चे नियंत्रण आहे.
या हल्ल्याची स्वतंत्रपणे पुष्टी करता आली नाही. मात्र, मंगळवारी पहाटे जारी केलेल्या निवेदनात अराकान आर्मीने म्हटले की, दुपारच्या सुमारास एका लढाऊ विमानाने स्थानिक बाजाराजवळ दोन बॉम्ब टाकले. या हल्ल्यात विक्रेते, ग्राहक आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक ठार झाले. या हल्ल्यात आणखी ५८ जण जखमी झाल्याचे संघटनेने सांगितले असून, त्यापैकी २२ जणांची प्रकृती गंभीर आहे.निवेदनात म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेल्या या जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांसाठी थेट जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि संघटनांविरोधात लवकरच प्रभावी प्रत्युत्तराची कारवाई केली जाईल.
रखाइनमधील बचावकार्याशी संबंधित वरिष्ठ अधिकारी वाई हुन आंग यांनी घटनास्थळी उपस्थित बचाव कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने ‘माध्यमांना मृत आणि जखमींच्या संख्येची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, हे बाजारपेठेतील प्रमुख घाऊक केंद्र होते. येथे संपूर्ण राज्यातून व्यापारी आणि ग्राहक येत होते. ते म्हणाले, “रखाइनमध्ये झालेल्या सर्वात भीषण हवाई हल्ल्यांपैकी हा एक आहे.”
दरम्यान, १ फेब्रुवारी २०२१ रोजी लष्कराने आंग सान सू ची यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता ताब्यात घेतल्यापासून म्यानमारमध्ये मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.या लष्करी सत्तेविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. सुरक्षा दलांनी या शांततापूर्ण निदर्शनांना दडपण्यासाठी प्राणघातक बळाचा वापर केल्यानंतर लष्करी राजवटीच्या अनेक विरोधकांनी शस्त्रे हाती घेतली. त्यामुळे म्यानमारच्या मोठ्या भागात सशस्त्र संघर्षाला सुरुवात झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode