दिवसभराच्या चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात दिवसभर मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला कमजोरीने व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगली वाढ नोंदवली. मात
Stock Market Closing


नवी दिल्ली, 30 सप्टेंबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात दिवसभर मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला कमजोरीने व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगली वाढ नोंदवली. मात्र, दुपारी दीड वाजल्यानंतर बाजारात चौफेर विक्री सुरू झाल्याने दोन्ही निर्देशांकांनी आपली संपूर्ण वाढ गमावली आणि ते लाल निशाणात घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स ४८.७८ अंक म्हणजेच ०.०७ टक्क्यांनी घसरून ७२,४८०.२९ अंकांवर, तर निफ्टी ९५.७५ अंक म्हणजेच ०.४२ टक्क्यांनी घसरून २२,६२०.४५ अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारातील चढ-उताराची तीव्रता यावरून स्पष्ट झाली की, सेन्सेक्स सुरुवातीच्या पातळीपासून ६२१.०८ अंकांनी वाढून ७३,०६२.२३ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने तो उच्चांकी पातळीवरून ६९५.७९ अंकांनी घसरून ७२,३६६.४४ अंकांपर्यंत खाली आला. अखेरच्या टप्प्यात झालेल्या किरकोळ खरेदीमुळे निर्देशांकाला काहीसा आधार मिळाला.

निफ्टीचीही अशीच स्थिती राहिली. सुरुवातीला ५१.२० अंकांच्या घसरणीसह २२,६६५ अंकांवर व्यवहार सुरू झाला. त्यानंतर खरेदी वाढल्याने निफ्टी १४४.३५ अंकांनी वाढून २२,८०९.३५ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर झालेल्या चौफेर विक्रीमुळे निफ्टी उच्चांकी पातळीवरून २१४.१५ अंकांनी घसरून २२,५९५.२० अंकांवर आला. अखेरच्या काही मिनिटांत झालेल्या किरकोळ खरेदीमुळे तो काहीसा सावरला.

आज धातू, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि औषधनिर्माण क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी विक्री झाली. बीएसईचा हेल्थकेअर निर्देशांक २.३५ टक्के, कन्झ्युमर ड्युरेबल निर्देशांक १.४३ टक्के, तर मेटल निर्देशांक १.२४ टक्क्यांनी घसरला. कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे रियल्टी, मीडिया आणि बँकिंग क्षेत्रात खरेदीचा जोर राहिला. आयटी, ऑटोमोबाईल, पीएसयू आणि ऑइल अँड गॅस निर्देशांकही वाढीसह बंद झाले. मिडकॅप निर्देशांक ०.०२ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२७ टक्क्यांनी वधारला.

बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.०३ लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४७१.७९ लाख कोटी रुपयांवर आले. मागील सत्रात हे ४७३.८२ लाख कोटी रुपये होते. आज कोटक महिंद्रा बँक, इंटरग्लोब एव्हिएशन, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स आणि विप्रो हे प्रमुख वाढणारे समभाग ठरले. तर अपोलो हॉस्पिटल्स, मॅक्स हेल्थकेअर, सिप्ला, एटरनल आणि अदानी एंटरप्रायझेस यांच्या समभागांत मोठी घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande