
मुंबई, 30 सप्टेंबर (हिं.स.)। अखेर ॲपलने भारतात आपली डिजिटल पेमेंट सेवा ‘ॲपल पे’ अधिकृतपणे लाँच केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सेवेच्या भारतातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर कंपनीने बुधवारी भारतात ‘ॲपल पे’ची कॉन्टॅक्टलेस पेमेंट सेवा सुरू केली. अमेरिकेत सप्टेंबर २०१४ मध्ये लाँच झाल्यानंतर जवळपास १२ वर्षांनी ‘ॲपल पे’ने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. भारतात ही सेवा सुरू करण्यासाठी ॲपलने मुंबईस्थित ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे.
‘ॲपल पे’च्या माध्यमातून आता आयफोन, आयपॅड आणि ॲपल वॉचच्या मदतीने कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार आहे. कंपनीकडून लवकरच मॅक उपकरणांवरही ‘ॲपल पे’चा सपोर्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे. वापरकर्ते प्रत्यक्ष दुकानांमध्ये एनएफसी-सक्षम पीओएस मशीनवर डिव्हाइस टॅप करून पेमेंट करू शकतील. याशिवाय ॲपमधील खरेदी तसेच ऑनलाइन मर्चंट्सकडेही ‘ॲपल पे’चा वापर करता येणार आहे.
सध्या भारतात ‘ॲपल पे’मध्ये केवळ ॲक्सिस बँकेकडून जारी करण्यात आलेली व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्ड जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित क्रेडिट कार्ड ॲपल वॉलेटमध्ये जोडल्यानंतर वापरकर्त्यांना प्रत्यक्ष कार्ड जवळ न बाळगता पेमेंट करता येईल.
‘ॲपल पे’च्या टॅप-टू-पे सुविधेसाठी एनएफसी म्हणजेच नियर फील्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रत्यक्ष दुकानात पेमेंट करण्यासाठी पीओएस मशीन एनएफसी-सक्षम असणे आवश्यक आहे. पेमेंट करताना कार्डचा पिन किंवा ओटीपी टाकण्याची गरज भासणार नाही. आयफोन, ॲपल वॉच किंवा अन्य समर्थित उपकरण पीओएस मशीनजवळ टॅप केल्यानंतर व्यवहार पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे भारतातील डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटच्या क्षेत्रात ॲपलची ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule